सावदा रुग्णालयाच्या नामकरणासाठी महायुतीचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील नगरपालिकेच्या मालकीचे रुग्णालय २०१० साली शासनाकडे वर्ग करण्यात आले असून, त्यावेळी “राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय” हे नाव कायम ठेवण्याच्या अटीवर ही हस्तांतरण प्रक्रिया पार पडली होती. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतरही शासनाकडून रुग्णालयाचे नामकरण झाले नसल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाच्या व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या हलगर्जी व आडमुठ्या धोरणाचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती व तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने दिनांक १९ मे २०२५ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण रुग्णालयासमोर करण्यात येणार आहे.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांना सादर करण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जनभावनांचा आदर करत रुग्णालयास तत्काळ “राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय” हे नाव देण्यात यावे. अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

हा विषय केवळ नावाचा नसून जनतेच्या आत्मसन्मानाचा असल्याचे भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भातील ठराव सन १९९९-२००० पासून अस्तित्वात असून, २०१० साली नगरपालिकेने तो ठराव शासनाकडे वर्ग करताना पुन्हा एकदा अधोरेखित केला होता. दरम्यान, उपोषणात सहभागी होणाऱ्यांमध्ये राजेंद्र श्रीकांत चौधरी (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा), सुरज परदेशी (शहरप्रमुख, शिवसेना), जितेंद्र भारंबे (शहराध्यक्ष, भाजपा) यांच्यासह भाजप, शिवसेना कार्यकर्ते व शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.

शासनाने जनभावना ओळखून तातडीने रुग्णालयाचे नामकरण करावे, अशी जोरदार मागणी यानिमित्ताने करण्यात येत आहे.

Protected Content