Home Cities बुलढाणा वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचा ‘हाय अलर्ट’; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन नियोजन

वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचा ‘हाय अलर्ट’; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन नियोजन


बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या यंत्रणेसाठी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला असून, या कालावधीसह संपूर्ण पावसाळ्यासाठी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालीन नियोजन केले आहे.

महावितरण अध्यक्षांकडून आढावा व निर्देश
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी आज, शुक्रवारी (दि. २३ मे), राज्यातील वीजपुरवठ्याचा सखोल आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, मुख्यालय आणि परिमंडल स्तरावर २४x७ आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) लगेचच स्थापन करण्याचे आदेश दिले. “कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये,” असे स्पष्ट निर्देश श्री. लोकेश चंद्र यांनी दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संचालक (संचालन) श्री. सचिन तालेवार यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता उपस्थित होते.

मान्सूनपूर्व परिस्थिती आणि उपाययोजना
यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची दररोज हजेरी लागत आहे. अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र सध्या स्थिर असले तरी, त्याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. दरम्यान, शुक्रवार (दि. २३ मे) पासूनच मुख्यालय आणि राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे.

ग्राहकांना माहिती आणि कर्मचाऱ्यांना सज्जतेचा इशारा
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने व वेळेत सुरू करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल, तर त्याबाबत संबंधित ग्राहकांना एसएमएस (SMS), व्हॉटस्ॲप ग्रुप्स (WhatsApp Groups), ट्विटर (Twitter), सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे ताबडतोब कळवण्यात यावे. खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीबाबत मुख्यालयाकडून पर्यवेक्षण करण्यात येत असून, शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू न झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. “सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. त्यासाठी क्षेत्रीय वरिष्ठ अभियंत्यांनी मोठ्या आणि गंभीर बिघाडाच्या ठिकाणी स्वतः जाऊन दुरुस्ती कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.

वादळवारा व मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईलसह इतर यंत्रसामग्री पुरेसे उपलब्ध ठेवावी, असेही सांगण्यात आले. नादुरुस्त झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी संबंधित अभियंते, कर्मचारी तसेच सर्व एजन्सींना मनुष्यबळ, सामग्री आणि वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहण्याची सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली. या पद्धतीने मान्सूनच्या आगमनानंतर पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरणच्या यंत्रणेने पूर्णपणे सज्ज राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, काम करत असताना सुरक्षा संबंधी सर्वोतोपरी काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले.


Protected Content

Play sound