भुसावळात विकास कामांसाठी महाविकास आघाडी उद्या रस्ता रोको करणार (व्हिडीओ)

bhusaval press

भुसावळ, प्रतिनिधी | येथील नगर परिषदेत भाजपा सत्तेवर आल्यापासून विकास कामे थांबलेली असून नागरिकांना खड्ड्यापासून हाडांचे अनेक आजार लागले आहेत. महागड्या दवाखान्यामध्ये उपचार करण्याची वेळ न.प. सत्ताधाऱ्यांनी आणली असून जनतेने यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. यासाठी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्या (दि.७) दुपारी विकास कामांसाठी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना रास्ता रोको करणार करणार असल्याची माहिती आज (दि.६) माजी आमदार संतोष चौधरी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

 

शहराच्या रस्त्यांची अवस्था दयनीय असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा नगर परिषदेच्या हद्दीत असून रेल्वेने त्या ठिकाणी राहणाऱ्या २५ ते ३० हजार परिवारांना कोच फॅक्टरी येणार असल्याचे सांगून बेघर केले गेले आहे. रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी पत्रकार परिषदेमध्ये कुठलीही कोच फॅक्टरी भुसावळात मंजूर झालेली नाही, हे स्पस्ट सांगितले आहे, मग डी.आर.एम. यादव व तोमर यांनी जनतेची दिशाभूल का केली ? ज्या अधिकाऱ्यांनी बेघर केले आहे, त्यांची तक्रार रेल्वे मंत्र्यांकडे केली जाणार आहे. तसेच रेल्वेने २० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांचे अतिक्रमण काढले, त्याचठिकाणी त्यांना घरासाठी जागा दयावी. तसेच त्यांची तोडलेली दुकाने बांधून दयावी. अमृत योजना ही राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेली होती व त्यासाठी हतनूर धरणातून पाणी यासाठी आणले जाणार होते. मात्र नगरपरिषदेने तसे न करता शेळगाव बॅरेजकडून उलटे पाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नुकसान होणार त्यास नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सूचक, अनुमोदन हे जबाबदार राहणार असून त्याची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी.

तसेच यांच्या सात/ बारा वरती बोजा बसवून ते नुकसान भरपाई करावी. तसेच या कामामुळे रस्त्याची जी हालत झाली आहे, त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अमृत योजनेसाठी जे पाईप लागणार होते, त्याचे टेंडर बाहेर करण्यात आले आहे. हे टेंडर कार्यालयाच्या आत करणे गरजेचे असते, पण अधिकाऱ्यांनी तसे न करता बाहेर टेंडर करून आपले कमिशन काढून घेतले. हा सर्व व्यवहार सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद झालेला आहे. याची जिल्ह्याधिकारी यांनी चौकशी करावी. तसेच सात ते आठ वर्षात भुसावळची ओळख गुन्हेगारांच्या यादीत झालेली असून मुलांना लग्नासाठी मुली देण्यास बाहेर गावातील परिवार देण्यास घाबरत आहेत. बेरोजगारांचे प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन राबविले तर एक पोते भर बंदूका शहरातून जमा होतील, अशी माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच जनाधार विकास पार्टीचे विरोधी पक्ष नेते उल्हास पगारे व नगरसेवक उपस्थित होते. या विकास कामासाठी रास्ता रोको केला जाणार आहे. त्यासाठी इतरही संघटनांना सहभाग घ्यायचा असल्यास त्यांचे स्वागत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

 

 

Protected Content