मुंबई, वृत्तसंस्था | भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला पूर्ण पाचवर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर, अन्य महत्त्वाच्या पदांचे वाटप समसमान होणार आहे. भाजपकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेसाठी ही लॉटरी असल्याचे मानले जात आहे.
समान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपशी टोकाचे मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या काँग्रेसने नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम व सत्तावाटपासंबंधीच्या चर्चेच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे हित हा तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमामधील प्रमुख मुद्दा असणार आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदानंतर उरलेल्या खात्यांचे वाटप १६-१४-१२ असे होणार आहे. शिवसेनेला १६, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महत्त्वाच्या खात्यांपैकी गृहखाते राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदासह महसूल हे खाते काँग्रेसला मिळणार आहे. अर्थ व नगरविकास खाते शिवसेनेकडे राहणार आहे. सरकार स्थापनेनंतर कुठलेही वाद होऊ नयेत आणि सर्व मुद्दे आताच स्पष्ट व्हावेत, असा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.