मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेत आले होते. तर निकालांनंतर राज्यात मविआकडून राज ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. उद्धव ठाकरेंनी सभेतून राज ठाकरेंना बिनशर्ट पाठिंबा म्हणत टोला लगावला तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनीही मनसेवर सुपारीबाज पक्ष म्हणून टीका केली. त्यावर राज ठाकरे यांना आज माध्यमांनी प्रश्न विचारला असता ‘ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या’ असं म्हणत या टीकेला फारसं महत्व देत नसल्याचं आपल्या प्रतिक्रियेतून त्यांनी दर्शविले.
मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच, लोकसभा निवडणुकांचे निकाल व आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचं धोरण यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तरं दिली.
राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या चालू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या मुद्द्यांवर ते भाष्य करत होते. या सर्व समाजांना एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. इतकी वर्षं मी भाषणांमधून सांगत आलोय की जातीपातीतून काहीही होणार नाही. सगळे पुढारी जातीपातींमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं मिळवतील. हे लोक भोळसटपणे मतं देतीलही. काल मला कुणीतरी एक क्लिप पाठवली ज्यात लहान लहान मुलं जातींवर बोलत होती. मी फार पूर्वीच म्हणालो होतो की हे सगळं प्रकरण शाळा-कॉलेजांपर्यंत जाणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात हे असं विष कधी नव्हते. जातीपातींचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा आवडणारी व्यक्ती असेल तरी जर विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? काय होणार महाराष्ट्राचं? यावरून उत्तर प्रदेश-बिहारसारखाच हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होईल, असे ते म्हणाले.