मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोरोनाची तिसरी लाट आदळणार असल्याचे स्पष्ट झाले असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यात कोरोना रूग्णसंख्येचा स्फोट होणार असल्याचे भाकीत केले आहे. ते म्हणाले की आपल्याकडे तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही.
दरम्यान, ते पुढे म्हणाले की, नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकार तसेच प्रशासनाने दिलाय. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.