Home Cities जळगाव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आधार! महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 लाखांची मदत

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आधार! महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 लाखांची मदत


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक जबाबदारीची भावना जपत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, महाराष्ट्र राज्य, मुंबईतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल 51 लाख रुपये इतक्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुपूर्त करण्यात आला.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी संचालक रमेश हिंगणकर, पांडुरंग घुगे, नितीन हिवसे, बळवंतराव पाटील, अशोक हटकर, भागवत दास तसेच व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबे पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी फेडरेशनच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “सहकार क्षेत्रातील संस्थांकडून मिळणारा हा हातभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल. समाजातील संस्थांनी जबाबदारीची भावना ठेवून अशा स्वरूपाचे योगदान दिल्यास राज्याची पुनर्बांधणी अधिक वेगाने होईल.”

या वेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम म्हणाले, “शेतकऱ्यांचे दुःख हे आपल्या समाजाचे दुःख आहे. सहकार क्षेत्रातून समाजासाठी काहीतरी करण्याची परंपरा आपण जपली पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची भावना आहे.”

राज्यातील सहकार क्षेत्र सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता आणि सहकारभाव व्यक्त झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound