
जळगाव,भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा जळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यात फिर्यादी ज्या ‘रॉयल कंपनी’त नोकरी करतात, त्याच कंपनीतील ड्रायव्हर शाहीद बेग हाच या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
घटनेची पार्श्वभूमी २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे कंपनीचे २५ लाख ४२ हजार रुपये एका बॅगेत घेऊन मोटारसायकलने घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला धक्का दिला. फिर्यादी तोल सांभाळत असताना, आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग हिसकावली आणि पळून गेले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची चक्रे फिरली
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान, पोलिसांना कंपनीतील ड्रायव्हर शाहीद बेग (वय २५) याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा घडवून आणल्याची कबुली दिली.
कट कसा रचला?
ड्रायव्हर शाहीद बेग हा कंपनीत पैशांची ने-आण करण्याच्या वेळांबाबत माहिती ठेवत असे. त्यानेच अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे एवढी मोठी रक्कम असल्याची ‘टिप’ त्याचे साथीदार मुजाहिद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिली. मुजाहिदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील अजहर मलक, अमीर खान आणि ईजहार बेग या तिघांना सांगितला. घटनेच्या रात्री या तिघांनीच प्रत्यक्ष लुटीचा गुन्हा केला.
६ आरोपी अटकेत, मोठी रक्कम जप्त
पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून मुख्य सूत्रधार शाहीद बेग याच्यासह कट रचणारे दोन आणि प्रत्यक्ष गुन्हा करणारे तीन असे एकूण ०६ आरोपी अटक केले आहेत. त्यांच्याकडून लुटीच्या २५.४२ लाखांपैकी २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि ०३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींनी संगनमत करून दरोडा टाकला असल्याने गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
आरोपींपैकी शाहीद बेग आणि अमीर खान या दोघांवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली आहे. सर्व आरोपींना ०३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे.



