बुलडाणा (प्रतिनिधी) । राज्यात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उद्या १ मे रोजी साध्यापणाने साजरे होत असून जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्ष पुर्ण होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचवेळी सकाळी 8 वाजता केवळ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष इतक्याच पदाधिकारी, अधिकारी यांना उपस्थित रहावयाचे आहे. कार्यक्रमादरम्यान कवायत, संचलन आयोजनास मनाई आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयात येथेच ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ ठेवू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे यांनी कळविले आहे.