…आता राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये जुंपली !

ncp congress

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसने शिवसेनेला पाठींब्याचे पत्र देण्यासाठी विलंब झाल्यानंतर आता याच मुद्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेत विलंब होत असल्याने आज राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत. सोमवारी शिवसेनेला राज्यपालांनी दिलेल्या कालावधीत दोन्ही काँग्रेसकडून पाठींब्याचे पत्र न मिळाल्याने त्यांना सत्ता स्थापनेचा दावा सोडावा लागला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले असून त्यांना आज अर्थात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, आज सकाळपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना काँग्रेसने पत्र दिल्याबद्दल विलंब केल्याने नाराजी व्यक्त केली. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर खासदार सुप्रीया सुळे यांनी पाठींब्याच्या पत्राबाबत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनाच विचारा असे सांगितले. तर माणिकराव ठाकरे व विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी फक्त हायकमांडच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. पत्र देण्याआधी किमान समान कार्यक्रम ठरविणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल आणि पी. वेणुगोपाल या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेटदेखील पुढे ढकलण्यात आली आहे. खुद्द पवार यांनी या प्रकरणी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमधील वार्ता आज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील काँग्रेस आमदारांची ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक मात्र घेण्यात येणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

यामुळे आता यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

Protected Content