महाराष्ट्र काँग्रेसला मिळणार नवीन प्रदेशाध्यक्ष


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे राजकीय बदल घडत असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड निश्चित झाली असून, अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. महत्त्वाचे म्हणजे, अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याने पक्षातील अस्वस्थता वाढली होती. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. सुरुवातीला हा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता, मात्र आता तो मंजूर करण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव प्रबळ मानले जात होते. मात्र, अंतिम क्षणी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे आले आणि आता त्यांची निवड निश्चित झाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या ग्रीन सिग्नलनंतर यावर अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. काँग्रेसने लढलेल्या 103 जागांपैकी केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. या अपयशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला होता. नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पक्षात नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर हर्षवर्धन सपकाळ यांची निवड निश्चित करण्यात आली.

हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान आहे. आगामी काळात पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांसाठी कशा प्रकारे तयारी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.