जळगाव प्रतिनिधी । फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याला शासनाने सात कोटी रूपयांची थकहमी दिली असून आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य मंत्री मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी ७ कोटी रुपयांची शासन थकहमी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत येत्या पावसाळ्यात पर्जन्यवाढीसाठी राज्यात उपाययोजना (एरीयल क्लाऊड सिडींग) करण्यास मान्यता देण्यात आली. यासोबत राज्यात मध उद्योगाला चालना देण्यासाठी मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विदर्भ, मराठवाडा क्षेत्रातील उद्योग घटकांना विद्युत शुल्क माफीची सवलत पाच वर्षांसाठी वाढविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पुणे आणि कोल्हापूर येथे मंजूर करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी ९२ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यासाठी बारामती नगर परिषदेंतर्गत असलेल्या क्रीडांगणाच्या आरक्षणात बदलास मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. याशिवाय, नियुक्त्या, सेवाज्येष्ठता, पदोन्नती आदींबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे समावेशन सार्वजनिक बांधकामकडून काढून पुन्हा वन विभागाकडे सुपुर्द करण्यात यावे असा निर्णयदेखील आज घेण्यात आला.