प्रेम हाच खरा धर्म : रहेमान अब्बास

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रेमाचा धर्म हाच खरा धर्म असून साने गुरुजींच्या या भूमीत प्रेम धर्माविषयी बोलतांना आनंद होत असल्याचे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक रहेमान अब्बास यांनी व्यक्त केले.

संमेलन अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांनी कॉ.शरद पाटील मुख्य मंचावर अध्यक्षीय भाषणात सांगितले की, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगत बलसागर हो भारताची स्वप्न पाहणारे साने गुरुजींचे व्यक्तिमत्व म्हणजे शांती व क्रांतीचे अद्भुत मिश्रण असलेली आहे. निर्मिती ही नुसती साहित्यिकांची कल्पना सृष्टी नसून त्यामागे त्यांचे अवलोकन आणि जीवनाअनुभव असतात. नित्य बदलणारे मानवी जीवन आणि साहित्य यांचा अनुबंध मान्य करावाच लागतो. नुसता बदल म्हणजे परिवर्तन नसून हा बदल सुधारणा घडवून आणणारा असतो म्हणून परिवर्तन हे व्यापक आहे. असे सांगत अमळनेर चे विद्रोही साहित्य संमेलन व्यापक परिवर्तन करणारे एतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला

मावळते अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या घनाघाती भाषणात “शासन खोक्याने पैसा देऊ शकते मात्र प्रेक्षक कुठून देतील?” असा सवाल करीत सत्ताधारी राज्यकर्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका केली.

विद्रोही चळवळीच्या अध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी यांनी विद्रोहाची भूमिका ठळकपणे मांडताना साने गुरुजीं, क्रांतिवीरांकना लीलाताई उत्तमराव पाटील व अमळनेरचे कामगार हुतात्मे श्रीपती पाटील यांच्या समतावादी विचारांची हि भूमी असून गेल्या १७ साहित्य संमेलनाचा इतिहास स्पष्ट करून अमळनेरचे १८ वे संमेलन सर्वच बाबतीत सरस आहे असे सांगितले. स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी बहुजन महामानवांच्या विचारांवर आधारित विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक प्रा.लिलाधर पाटील यांनी पुणे विद्यापीठात ड्रामा विभागाच्या विद्यार्थिनीवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा व प्रवृत्तीचा निषेध नोंदवत विद्रोहा च्या बाजूने उभे राहण्याची परंपरा आम्ही जोपासू ! असे सांगितले.

सूत्रसंचालनात निमंत्रक रणजीत शिंदे यांनी सुप्रसिद्ध हिंदी कवी संपत सरल हे हृदयविकाराच्या आजारामुळे न येवू शकल्याने त्यांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखवला संपत सरल यांनी सदर संदेशात कळविले होते की मुक्त अभिव्यक्तीवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सत्ताधारी संस्थांकडून सुरू आहेत. राजकारण, कॉर्पोरेट आणि धर्म यांच्या संगनमताने सर्व मानवी मूल्ये नष्ट झाली आहेत. शिक्षण हे उत्पादन झाले आहे. ज्याच्याकडे क्षमता आहे, त्याने जमेल तेवढी खरेदी करावी.असे धोरण सुरू असल्याचे सांगत जागतिकीकरणाच्या अंधारात हरवलेल्या लोकांना विद्रोही मराठी साहित्य संमेलनासारखे कार्यक्रमच प्रकाश दाखवू शकतात.आभार मुख्य समन्वयक प्रा अशोक पवार यांनी मानले.

याप्रसंगी कॉ.शरद पाटील मंचावर पूर्वाध्यक्ष गणेश विसपुते, डॉ. प्रल्हाद लुल्हेकर, पूर्वअध्यक्ष डॉ. प्रतिमा अहिरे,नितेश कराळे,डॉ.अशोक चोपडे, प्रा. रामप्रसाद तोर, यांचेसह करीम सालार ,मुकुंद सपकाळे,लीना पवार,अविनाश पाटील,प्रशांत निकम, अध्यक्ष गौतम मोरे, राजेंद्र कळसाईत , डॉ अंजुम कादरी, डॉ.माणिक बागले, अंकुश सिंदगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाच्या सुरुवातीला साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने मंचावर साने गुरुजी विद्यालय व सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत गाऊन संमेलनाची सुरुवात केली. सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांनी सादर केलेल्या संमेलन गीतास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद दिला. तर यावेळी महात्मा फुले कृत सत्याच्या खंडाचे गायन शितल गावित यांनी पावरी वादन अमृत बिल्व सहकारी यांनी तर लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या वंदन माणसाला या गीताचे सादरीकरण शाहीर भास्कर अमृतसागर व सहकाऱ्यांनी केले.

संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंचावरील मान्यवरांनी पेनाची साखळी तोडून व मानवी तोंडाला लावलेली चिकटपट्टी काढून फेकत, आता हातातली लेखणी उचलून आणि तोंडावरील पट्टी काढून मुस्कटदाबीच्या विरोधात आणि लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लढले पाहिजे असा संदेश दिला.

Protected Content