रांजणगाव येथे लसीकरणासाठी स्थानिकांनाच प्राधान्य : परिसरातील नागरिकांचा आरोप

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी  । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कोव्हीशिल्ड लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. तालुक्यातील रांजणगाव येथील आरोग्य केंद्रात आज लसीकरण करण्यात आले.  यावेळी स्थानिकांनाच प्राधान्य दिले जात असल्याची तक्रार रांजणगाव परिसरातील ग्रामस्थांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना केली.

चाळीसगाव तालुकासह जिल्हात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांना हतबल करून ठेवले आहे. या दुसऱ्या लाटेत मृत्यू दर हि झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनावर प्रभावी ठरलेल्या कोव्हीशिल्ड लसीकरणाला सुरूवात केली आहे. तालुक्यातील रांजणगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या अखत्यारीत रोकडे, खेर्डा, सोनगाव, बाणगाव , लोंजे, पाथर्डे, तळोदा बोढरे, जुनोने, सांगवी व रांजणगाव आदी गांवाचा समावेश आहे. आरोग्य केंद्रात आज चाळीस कोव्हीशिल्ड लस उपलब्ध झाल्याने लसीकरण करण्यात आले. यावेळी लसीकरणासाठी आलेल्यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी संवाद साधताना या केंद्रात फक्त स्थानिकांना अगोदर प्राधान्य दिले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सर्वसामान्यांना कोव्हिशिल्ड लस केव्हा मिळेल? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान लसीकरण करण्यासाठी सकाळपासून  एकाच जागी बसून असल्याने काहींनी डॉ. प्रमोद ओसवाल यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळाली. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

Protected Content