‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’चा दणका : ‘त्या’ सावकारग्रस्तांना मिळणार न्याय !

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उपनिबंधकांनी दिलेल्या निकालानंतर देखील शेतकर्‍यांना जमीन मिळत नसल्याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शासकीय यंत्रणा हलली असून पुढील आठवड्यात संबंधीत शेतकर्‍यांना जमीन मिळणार असल्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्याने संबंधीतांनी उपोषण सोडले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल आणि रावेर तालुक्यातील सावकारांनी हडप केलेल्या जमिनी मूळ शेती मालकांना परत देण्याचा ऐतीहासीक निकाल जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. या अनुषंगाने संबंधीत शेतीच्या उतार्‍यांवर मूळ मालकांची नावे देखील लागलीत. तथापि, महसूल प्रशासनाकडून त्यांना या शेतजमीनीचा ताबा देण्यात आलेला नाही. या संदर्भात तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून देखील काहीही कार्यवाही न झाल्यामुळे या सावकारग्रस्त स्त्री-पुरूषांनी २३ जानेवारीपासून फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.

दरम्यान, आजवर प्रशासनाने या उपोषणकर्त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही. तर दुसरीकडे उपोषणात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेल्या उषाबाई टोपा जंगले, आशाबाई रवींद्र पाटील आणि सीमाबाई चंद्रकुमार फेगडे या तीन महिलांची प्रकृती आज खालावली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले होते. या प्रकरणी आज दुपारी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यानंतर शासकीय यंत्रणा हादरली. यानंतर पटापट सूत्रे हलली.

या शेतकर्‍यांना न्याय देणारे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी फैजपूर येथील उपोषणकर्त्यांनी भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत आश्‍वस्त केले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेले लेखी आश्‍वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना सुपुर्द केले. यात शासकीय नियमानुसार सावकारग्रस्तांकडील जमीन ही मूळ मालकांना परत करण्याचे अधिकार हे यावल आणि रावेर येथील सहायक निबंधकांना देण्यात आल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही अधिकार्‍यांना संबंधीत कामासाठी प्राधीकृत करण्यात आले आहे. या आदेशाची प्रत फैजपूरच्या प्रांताधिकार्‍यांसह यावल आणि रावेरच्या तहसीलदारांना प्रदान करण्यात आली. पुढील आठवड्यात ही कारवाई करून मूळ मालकांना शेतजमीनीचा प्रत्यक्ष ताबा मिळेल अशी ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली. यामुळे सावकारग्रस्त शेतकर्‍यांनी सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज समाप्त केले.

याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, प्रांताधिकारी कैलास कडलग, सहायक पोलीस निरिक्षक सिध्देश्‍वर आखेगावकर, भरत महाजन, रवी जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. तर, या प्रकरणी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने पहिल्यापासून पाठपुरावा केल्याने उपोषणकर्त्यांनी आभार मानले आहेत.

Protected Content