नवी दिल्ली प्रतिनिधी । क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भाजपच्या तिकीटावर खासदार झालेला गौतम गंभीर सध्या या न् त्या कारणामुळे चर्चेत आहे. २०११ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सल्ला ऐकल्यामुळे माझे शतक हुकले, असा खळबळजनक आरोप गंभीरने केला आहे. त्यानंतर नेटिझन्सनी मात्र गंभीरलाच धारेवर धरले आहे.
दिल्लीतील प्रदूषणावर संसदीय बैठकीला दांडी मारुन इंदूरमध्ये जिलबीवर ताव मारणाऱ्या गंभीरचे फोटो दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुन सोशल मीडियावर ट्रोलिंग, तर दिल्लीत ‘आमचे खासदार बेपत्ता’ असे होर्डिंगही लागले. हे कमी होतं, म्हणून की काय गंभीरने एका ऑनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत धोनीवर खापर फोडून नेटिझन्सचा आणखी रोष ओढवून घेतला आहे.
कर्णधार धोनीने दिलेल्या सल्ल्यामुळे माझं लक्ष विचलित झालं आणि माझी शतकी खेळी होऊ शकली नाही’ असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. 2011 मधील विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 97 धावांवर खेळताना अचानक काय झालं? हा प्रश्न मला अनेक वेळा विचारला जातो. 97 वर पोहचेपर्यंत मी वैयक्तिक धावसंख्येचा विचारच केला नव्हता, असं मी प्रत्येक तरुणाला सांगतो. श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा एकच विचार माझ्या डोक्यात होता. मला चांगलंच आठवतंय, षटक संपल्यावर धोनी माझ्याजवळ आला. मी आणि तो क्रीझवर होतो. तो म्हणाला, तीनच धावा बाकी आहेत. तीन धावा काढ म्हणजे तुझं शतक पूर्ण होईल. असं गौतमने सांगितलं.