लेवा पाटीदार समाजाचा विवाहेच्छूक वधू-वर मेळावा ८ नोव्हेंबरला पुण्यात 


सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  लेवा पाटीदार समाजाचा भव्य-दिव्य आंतरराष्ट्रीय विवाहेच्छू वधू-वर पालक मेळावा शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.०० या वेळेत निवृत्ती लॉन, रावेत, पिंपरी चिंचवड, पुणे येथे उत्साहात पार पडणार आहे. या मेळाव्याचे आयोजन समता भ्रातृ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून समाजातील देश-विदेशातील इच्छुक वधू-वर आणि पालकांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या भव्य मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. केतकी पाटील, मोरेश्वर भोंडवे आणि नामदेव ढाके उपस्थित राहणार आहेत. तसेच समाजातील नामवंत उद्योजक आणि मान्यवरांमध्ये विलास बोरोले, डॉ. सागर राणे, शिवाजी साकेगावकर, किरण पाटील, नितीन बोंडे, डॉ. पवन भोळे, किशोर नारखेडे आणि अनिल परतणे यांचा विशेष सहभाग राहणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मेळावा अधिक प्रेरणादायी ठरणार आहे.

या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या समाजबांधवांसाठी ऑफलाईन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) आणि रंगीत वधू-वर सुचीची हार्ड कॉपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक पालकांना प्रत्यक्ष संवाद आणि चर्चा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांचे पालक यांच्यासाठी ही एक अनोखी संधी ठरणार आहे.

समता भ्रातृ मंडळाने समाजातील सर्व बांधवांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी www.samatabhratrumandal.com या संकेतस्थळावर सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच माहितीकरिता टोल फ्री क्रमांक ०२०-७११७३७३३ वर संपर्क साधावा, असे मंडळाचे अध्यक्ष हेमंत श्रीरंग झोपे व सचिव रविंद्र नामदेव बहाटे यांनी कळविले आहे.

समता भ्रातृ मंडळाच्या माध्यमातून आयोजित होणारा हा मेळावा लेवा पाटीदार समाजाच्या एकतेचा आणि प्रगतिशील विचारांचा प्रतीक ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियोजनबद्ध आयोजन आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे समाजातील विवाहसंस्कृतीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.