

चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात जनगणना २०२७ साठी घरयादी व घरगणना पूर्वचाचणी (एचएलओ) प्रकल्पांतर्गत प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ जनगणना संचालनालय संचालक डॉ. निरुपमा डांगे यांच्या हस्ते झाला. तालुक्यातील भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन भारत सरकारने प्रायोगिक स्वरूपात चोपड्याची निवड केली आहे. सातपुड्याच्या डोंगरदऱ्या आणि दक्षिणेस तापी नदीच्या खोऱ्याचा समावेश असलेला हा भाग जनगणनेच्या चाचणीसाठी महत्त्वाचा ठरला आहे, असे डॉ. डांगे यांनी उद्घाटनावेळी सांगितले.
गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी डॉ. निरुपमा डांगे यांच्यासोबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जनगणना सहसंचालक वीरेंद्र दीक्षित, उपसंचालक सागर बागुल, पंकज समूहाचे संचालक पंकज बोरोले, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, मुख्याध्यापक मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी जनगणना २०२७ ही भारताच्या इतिहासातील पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना असेल, असे डॉ. डांगे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात इमारती आणि घरांची ओळख करून त्यांचे भौगोलिक स्थान निश्चित केले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाईल. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया दोन मोबाइल ऍपद्वारे होणार असून, नागरिकांना प्रथमच ‘स्व-गणना’ करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून व्यक्तींना स्वतःची माहिती वेब पोर्टलवर सुरक्षितरीत्या नोंदवता येईल.
डॉ. डांगे यांनी प्रशिक्षण सत्रांना प्रत्यक्ष भेट देत प्रगणक आणि पर्यवेक्षकांना विविध प्रक्रियांची माहिती दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्या म्हणाल्या की, “ही जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून, देशाच्या प्रशासनिक आणि सामाजिक नियोजनाचे भक्कम पायाभूत साधन आहे.”
६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान १३७ प्रगणक आणि पर्यवेक्षकांना घरयादी व घरगणना पूर्वचाचणी (एचएलओ) संदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अंतर्गत चोपडा तालुक्यातील २६ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रायोगिक चाचणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, मोबाईल अॅपचे कार्य आणि डेटा संकलन प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून २०२७ च्या मुख्य जनगणनेसाठी तयारी करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सहसंचालक वीरेंद्र दीक्षित, उपसंचालक सागर बागुल, सहायक संचालक व जनगणना अधिकारी अजय ठाकूर, संजय नाईक, संस्थेचे अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील, विशाल दिवेकर, श्रीकांत बनकर, मयूर पवार, प्रणय कडू, आशिष यादव, प्रदीप सिंग, प्रणय कडुकर, नायब तहसीलदार योगेश पाटील, अव्वल कारकून वंदना दाभाडे, किशोर ठाकरे, मोतीलाल कोळी, सुमारसिंग बारेला, अनिल मोरे, भरत चौधरी, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले, तर आभार तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मानले.



