चाळीसगाव-जळगाव महामार्गावरील फलक बदलण्याबाबत पत्र !

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातून जाणाऱ्‍या जळगाव-चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ चे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले असून महामार्गाच्या बाजूला हिंदीमध्ये नोटीस बोर्ड दर्शविले गेले होते. मराठी एकीकरण समितीचे जितेंद्र कोळी यांनी महामार्ग विभागाकडे तक्रार दाखल केली असून त्यांनी ही बाब आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास आणली होती. त्या अनुषंगाने आमदारांनी आज कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांना पत्र लिहिले आहे.                      

तालुक्यातून जळगाव –चांदवडकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ वरील गाव तसेच शहरातील फलकांवर हिंदीत नाव लिहीण्यात आले असून गावाची चुकीची माहिती देणारे फलक बदलविले आहे.

त्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग धुळे विभाग यांनी दुरुस्त केलेल्या नावांच्या फलकांचा छायाचित्रांसह अहवाल आमदार मंगेश चव्हाण यांना दिला आहे. त्यामुळे मराठी एकीकरण समितीच्या मागणीला आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिसाद देऊन सदर हिंदी भाषेतील फलक बदल करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत. यात चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील खालील गावांच्या फलकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत. चुकलेले नाव जलगाँव (मुळनाव जळगाव), चालीसगाव (मुळनाव चाळीसगाव),पाटोंडा (मुळनाव पातोंडा), मुंडखेडे (मुळनाव मुंदखेडे), डाम्रुन (मुळनाव डामरूण), तांदळवाडी (मुळनाव तांदूळवाडी), पिंपरि बु (मुळनाव पिंप्री बु) आदींचा त्यात समावेश आहे.

 

 

Protected Content