होऊनच जाऊ द्या ‘कोण सच्चा कोण झूठा’ ? ; सर्वेक्षण अहवाल करा सार्वजनिक!

girish mahajan at patil

 

जळगाव (प्रतिनिधी) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी आपला घात केला. अन्यथा भाजप व संघाने केलेल्या सर्वेक्षणात माझा अहवाल चांगला आला होता,असा दावा विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांनी काल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. तर दुसरीकडे तीन वेळेस केलेल्या सर्वेक्षणात खासदार पाटील मागे पडत असल्याचे कालच ना.महाजन यांनी सांगितले. एकंदरीत कोण सच्चा कोण झूठा? हे मतदारांना जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आता ना.महाजन आणि खासदार पाटील यांनी आपापल्या जवळील सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करून स्वतःचे म्हणणे सिद्ध करणे गरजेचे झाले आहे.

 

मंगळवारी पारोळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या सांगण्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माझ्या विराेधात षडयंत्र रचून खासदारकीचे तिकिट कापले. तसेच पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे होतो. एवढेच नव्हे तर, माझ्या उमेदवारीबाबतचा निर्णय चुकीचा असल्याचे संघ परिवारानेही मान्य केले असल्याचे ए.टी.पाटील यांनी सांगितले. तर दुसरीकडे तीन वेळेस केलेल्या सर्वेक्षणात खासदार पाटील मागे पडत असल्याचे ना.महाजन यांचे म्हणणे आहे. एकंदरीत दोघ जण आपापला दावा पक्षाने केलेल्या सर्वेक्षणावर आधारित असल्याचे म्हणताय.

 

भारतीय जनता पक्षाने मागील वर्षी भाजपच्या सर्व खासदारांच्या मतदार संघात सर्वेक्षण केले होते. त्यानुसार खासदारांनी या अहवालावर अभ्यास करून आपल्याला नेमके किती गुण मिळाले त्यावर चिंतन करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. तर २३ पैकी ११ खासदारांना चांगले काम करण्यात अपयश आल्याचे सर्वेक्षण अहवाल नमूद होते. याच सर्वेक्षणात पक्षाच्या १२२ पैकी ३९ आमदारांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे देखील समोर आले होते. याच सर्वेक्षणाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय आमदारांना चांगलेच फैलावर घेतले. ‘३९ आमदार आणि ११ खासदारांच्या उमेदवारीला मोठा विरोध होणार आहे. त्यामुळे या आमदार, खासदारांना प्रचंड मेहनत घेत कामगिरीत सुधारणा करावी लागेल,’ असा सल्लाही त्यांनी दिला होता.

 

भाजपने केलेल्या सर्वेक्षणात जनतेच्या भावना काय आहेत? कोणत्या मतदारसंघात जनतेची पहिली पसंती आज कोणत्या पक्षाचा कोणता नेता आहे?, कोणत्या मतदारसंघात आमदार व खासदाराची लोकप्रियता कशी आणि किती आहे? हे अहवालात नमूद होते. आजच्या परिस्थितीत मतदारसंघांमध्ये कोणकोणते समाज भाजपाच्या बाजूने आहेत, कोणते विरोधात जाऊ शकतात. नेमकी नाराजी काय आहे? कुठल्या कामांवर मतदार खुश आहेत, याचीही माहिती सर्वेक्षणात देण्यात आली होती.

 

एका खाजगी कंपनीकडून भाजपने राज्यभरातील खासदार आणि आमदारांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करून घेतले आणि आज प्रत्येकाच्या हाती त्याबाबतचा अहवाल दिला. या अहवालात आपल्या मतदारसंघासंबंधी बारीक-सारीक तपशील तसेच जनतेचा कानोसा घेण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघातील अनेक गावांमध्ये फिरून हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

 

एकंदरीत खासदार ए.टी.पाटील यांची उमेदवारी कापण्यामागे पक्षांतर्गत राजकारण आहे की, खरचं पक्षाच्या सर्वेक्षणात ते मागे पडत होते. याबाबत अधिकृत खुलासा होणे गरजेचे आहे. त्यामुळे ना.महाजन यांनी त्यांच्या जवळील आणि खासदार पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील सर्वेक्षण अहवाल मतदारांना दाखवावा. जेणे करून दोघांपैकी कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय, हे लक्षात येईल.

One Response

Add Comment

Protected Content