पाडळसे परिसरात बिबट्याचा वावर; वन विभागाचा सतर्कतेचा इशारा

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन महिन्यांपासून यावल तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असून, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता बिबट्याचा वावर पाडळसे गावाच्या शिवारातही जाणवू लागला आहे.

दि. २९ एप्रिल २०२५ रोजी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पाडळसे गावाजवळील गट क्रमांक १२३४ व ८४३ मधील शेतशिवरात बिबट्या पाहण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ लीलाधर रवींद्र चौधरी यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्या पुनम पाटील यांनी यावल पूर्व वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक वनपाल अतुल तायडे यांच्याशी तात्काळ संपर्क साधला.

त्यानंतर वनपाल अतुल तायडे आणि रवींद्र तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन शिवाराची पाहणी केली. या पाहणीत बिबट्याचे स्पष्ट पायांचे ठसे आढळून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि शेतात काम करणाऱ्यांनी अधिक खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सदर घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

वन विभागाकडून लवकरच पथक पाठवून पुढील तपासणी व उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी दिली. दरम्यान, काही अप्रीय घटना घडण्यापूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच, रात्रीच्या वेळी अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Protected Content