नाशिक प्रतिनिधी । औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय धमासान होत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रीतपणे निर्णय घेतील असे जाहीर केले आहे. ते आज येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. याप्रश्नी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री बसून तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला. नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.