जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महात्मा गांधी मार्केटच्या आवारात सट्टाजुगार खेळणाऱ्यांवर शहर एलसीबीच्या बुधवारी कारवाई केली. याठिकाणाहून १ हजार ८० रुपयांची रोकड जप्त केली असून सट्टा खेळविणाऱ्या सचिन आनंदा जाधव (वय २५, रा. जोशीपेठ) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गांधी मार्केट परिसरात सट्टा जुगार खेळविला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी विजय पाटील, रवी नरवाडे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, योगेश पाटील, अमोल ठाकूर यांना सोबत घेवून गांधी मार्केटच्या आवारात सुरु असलेल्या सट्टापेढीवर धाड टाकली. याठिकाणी कागदावर सट्ट्याचे आकडे खेळणारे पळून गेले तर सट्टा खेळविणारा सचिन जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून सट्टा खेळविण्याच्या साहित्यासह १ हजार ८० रुपये मिळून आले. तसेच त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा सट्टा शैलेश ठाकरे यांचा असून तो याठिकाणी रोजंदारीने काम करीत असल्याचे सचिन जाधव यांने पोलिसांना सांगितले. त्यानुसार विजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित सचिन जाधव याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.