बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पोलिस ठाण्यावर मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
एका ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलीस वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असलेला डीजे बंद झाला. यानंतर काही वेळेनंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास 30 जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून आला असून पोलीस ठाण्याची हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची या जमावाने तोडफोड केली. या घटनेबाबत भाष्य करण्यास, माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. आठ ते 10 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. थेट पोलीस ठाण्यावर समाजकंटकांनी हल्ला करत तोडफोड केल्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सामान्य नागरिकांविरोधात कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आता हल्लेखोरांविरोधात किती कठोर कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.