मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपच्या नेत्या ऍड. ललीताताई शाम पाटील यांनी आज मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला असून त्या मविआच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून आधी राष्ट्रवादीने निवडणूक लढविली असली तरी यंदाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेना-उबाठा पक्षाला सुटला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षाने सर्वेक्षणादी माध्यमातून येथे जोरदार तयारी देखील केली आहे. जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने आदींची नावे यासाठी संभाव्य उमेदवार म्हणून घेतली जात होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच अमळनेर येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ऍड. ललीताताई पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक सुरू असतांना उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले गेले. त्या शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळी ऍड. ललीताताई पाटील यांनी मातोश्रीवर आयोजीत कार्यक्रमात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे तिकिट दिले जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, या जळगावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील. यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुणाला तिकिट मिळणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.