
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त वाणी मंगल कार्यालयात ह.भ.प. सौ. विद्याताई येवले (जळगाव) यांचे प्रेरणादायी प्रबोधन आयोजित करण्यात आले होते.

सौ. विद्याताई येवले यांनी आपल्या प्रबोधनातून महिलांच्या जीवनातील संघर्ष, सहनशीलता आणि कर्तृत्व यावर मार्मिक विचार मांडले. त्यांनी सांगितले की, “स्त्री जन्म तुझी कहाणी – ओठांवर हसू आणि डोळ्यांत पाणी!” बालपणापासून वृद्धत्वापर्यंत महिलेला विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ती जगतजननी असून दोन कुळांचा उद्धार करणारी असते. अध्यात्म, विचार, संसार, संस्कार आणि आर्थिक स्वावलंबन यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिला मंडळातर्फे ह.भ.प. सौ. विद्याताई येवले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ भगिनी कुडे ताई आणि अन्य होतकरू महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. शीतल केले, उपाध्यक्ष सौ. प्रतिभा येवले व अन्य महिला सदस्य तसेच समाज भगिनींनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. पुनम येवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. गिरीजा मुसळे यांनी मानले. “नारी की निंदा मत करो, नारी है रतन की खान, जिससे जनमे राम, कृष्ण, हनुमान!” या विचारांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.


