चोपडा शहरात पाणीटंचाई असताना लाखो लिटर्स पाण्याची नासाडी (व्हिडीओ)

f897d108 f67a 4d43 82f3 98b3ef41a96c

चोपडा (प्रतिनिधी) एकीकडे शहरात पाण्याची मोठया प्रमाणात टंचाई निर्माण झाली असताना त्यावर उपाययोजना म्हणून तालुक्यातील गूळ मध्यम प्रकल्पातील पाणी जिल्हाधिकारी जळगांव यांच्या आदेशानुसार शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील पाण्याचे आवर्तन महिन्यातून दोनदा सोडण्यात येते. एवढी तीव्र पाणीटंचाई असतानाही ऐन उन्हाळ्यात शहरातील पवार नगरमधील मोकळ्या जागेत तुडुंब असा पाण्याचा तलाव निर्माण झाल्याने येथील रहिवासी आश्चर्य चकित झाले आहेत.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरासाठी नुकतेच गूळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन हे थेट पाईपलाईनद्वारे सोडण्यात आले. मागील एक वर्षापासून या परिसरात पिण्याच्या पाण्याची (फिल्टर पाण्याची) पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनला आता गुळ नदीची पाईपलाईन जोडण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१२) पहाटे २.०० वाजेपासून सदर पाईपलाईन फुटल्याने दुपारी ३.३० पर्यंत अविरत पाण्याची नासाडी झाली. सुमारे १२ तास उलटूनही याकडे नगरपालिका पाणी पुरवठा विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. नगरपालिकेकडे वेळोवेळी संपर्क साधून देखील १२ तासांपर्यंत कुणीही याची दखल घेतलेली नाही, असाही नागरिकांचा आरोप आहे.

ऐन उन्हाळ्यात पवार नगरात पाण्याचा तलाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. लाखो लिटर पाणी यात वाया गेले आहे. पाणी पुरवठा विभागाला कळवूनही पाईपलाईन दुरुस्तीसाठी एवढा विलंब का लागला असावा ? असा सवाल निर्माण झाला आहे. याबाबत गटनेते जीवन चौधरी यांना याविषयी माहिती दिली असता त्यांनी दुपारी २:३० वाजता पाणी पुरवठा विभागाचे खेवलकर व तेजस कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर यांना घटनास्थळी पाठवले होते. तेव्हा त्यांना सदर व्हॉल्व्ह बंद करून अन्य भागात पाणी पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे सांगितले. तरीही बराच वेळपर्यंत पाणी वाहतच होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणी पुरवठा विभागाच्या बेपर्वाईमूळे पाण्याची नासाडी झाली, अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाश्यांकडून उमटत आहेत. याविषयी नगरपालिकेचे सचिन गवांडे यांना भ्रमणदूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

पहा । पाणी टंचाई असतांना होणारी पाण्याची नासाडी

Add Comment

Protected Content