धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बस स्थानकापासून ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्यावर सूचनाफलक आणि दिशादर्शक फलकांचा मोठा अभाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी असलेले फलकही तुटलेल्या अवस्थेत असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. काही वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप व्यक्त करत उपाययोजन करण्याची मागणी केली आहे.
या रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने हा रस्ता कोणत्या दिशेने जातो किंवा पुढील ठिकाणाचे अंतर किती किलोमीटर आहे, याची माहिती मिळत नाही. यामुळे अनोळखी वाहनचालकांना मार्ग शोधण्यासाठी अधिक वेळ लागतो, तसेच चुका होण्याची शक्यताही वाढते. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांनी तातडीने रस्त्यावर आवश्यकतेनुसार नवे सूचनाफलक आणि दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.




