यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील वाढत्या विस्तारामुळे नव्याने वसलेल्या वस्त्यांमध्ये नागरी सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. विशेषतः पावसाळ्यात समस्यांना अधिक धार येत आहे. सध्या फालक नगर, आयशा नगर आणि पांडूरंग सराफ नगरसारख्या वसाहतीजवळून वाहणाऱ्या प्रमुख नाल्याची नगर परिषदेकडून सफाई करण्यात आलेली नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि रोगराईच्या शक्यतेने नागरिक चिंतेत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे कदीर खान यांनी प्रशासनाकडे तातडीने नाला स्वच्छतेची मागणी केली आहे.
कदीर खान यांनी स्पष्टपणे सांगितले की, जून महिना संपूनही यावल नगर परिषद प्रशासनाने या महत्त्वाच्या नाल्याची कोणतीही साफसफाई केली नाही. परिणामी या नाल्यात कचरा साचून दुर्गंधी पसरली असून, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, पावसाचे पाणी वाहून नेणारा हा नाला तुंबल्यास आसपासच्या वसाहतींमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
या नाल्याच्या अनियमित देखभालीमुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या भागात लहान मुले, वृद्ध आणि महिलांची संख्या मोठी असल्याने आरोग्याच्या दृष्टीने धोका अधिक गंभीर मानला जात आहे.
नागरिकांनी यापूर्वीदेखील अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे नाला सफाईची मागणी केली होती, मात्र ती वारंवार दुर्लक्षित करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल शहरवासीयांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कदीर खान यांनी यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशीकांत गवई यांच्याकडे मागणी केली आहे की, तात्काळ स्वच्छता विभागाला आदेश देऊन संबंधित नाल्याची सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा.