जळगाव प्रतिनिधी । एकात्किक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2019-2020 अंतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण व कृषी यांत्रिककीकरण उपअभियांतर्गत ट्रॅक्टर व इतर औजारे या घटकांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील ज्या शेतकऱ्यांना सदरचा लाभ घ्यावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी आपल्या अर्जासोबत 7/12 उतारा, खाते उतारा, आधार कार्ड,बँक पासबुक,व जातीचा दाखला इत्यादि कागदपत्रे आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत सादर करून संबंधित प्रवर्गातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ,जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.