मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण देखील सारखेच असल्याचे नमूद करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने राज्यात भडका उडालेला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आजपासून राज्यभरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या पदाधिकार्यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला.