जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून तालुक्यातील भदली येथील तरूणाला बेदम मारहाण व चाकूने वार करून जखमी केल्याची घटना किनोद शिवारात १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, समाधान श्रावण वाघ (वय-३७) रा. भादली खूर्दे ता. जि.जळगाव हा फोटोग्राफर आहे. १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास किनोद गावात बाजार करण्यासाठी दुचाकीने जात होता. किनोद शिवारातून जात असतांना शुभम सोपान सोनवणे रा. भादली खुर्दे ता.जि.जळगाव याने समधान वाघ याला भारत पेट्रोल पंपाजवळ थांबविले. एका गंभीर संशयावरून शुभम सोनवणे याने सामाधान वाघ याला बेदम मारहाण केली. यात शुभमने चाकूने समाधानच्या हातावर वार केले. यात समाधान गंभीर जखमी झाला तसेच तू जर माझ्या विरूध्द पोलीसात तक्रार दिली तर मी तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. सामाधान याच्यावर प्राथमोपचार केल्यानंतर बुधवारी रात्री १०.४५ वाजता जळगाव तालुका पोलीसात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण आगोणे करीत आहे.