नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करावा – आ. पाटलांचे आवाहन

पाचोरा प्रतिनिधी । अजिंठा डोंगर रांगा भागात ढगफुटी झाल्यामुळे सोयगाव तालुक्यातील भिलदरी येथील प्रकल्प फुटल्याने तितुर आणि गढद नदीला महापुर आल्याने तालुक्यातील ११ तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून तात्काळ संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन आ.किशोर पाटील यांनी केले. 

दोन्ही तालुक्यात ५० घरांची पडझड व सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असुन नगरदेवळा, कजगाव येथील पुल वाहुन गेले असुन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे याशिवाय अनेक गावात इलेक्ट्रीक तारा तुटुन व विजेचे खांब पडल्याने १० ते १२ गावांचा विज पुरवठा खंडित झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. 

पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा व भडगाव तालुक्याची आपातकालीन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, मुकेश हिवाळे, पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, रविंद्र लांडे (भडगाव), गटविकास अधिकारी अतुल पाटील, आर. ओ. वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी बी. बी. बोर्डे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, गजानन पडघम (भडगाव), सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये (पिंपळगाव हरेश्र्वर), नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, रमेश मोरे, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शाम दासकर, उप कार्यकारी अभियंता आर. बी. शिरसाठ, लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अनिल पाटील, पाटबंधारे विभागाचे आर. एस. मोरे, बांधकाम विभागाचे ए. जी. शेलार, डी. एम. पाटील, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.

सोयगाव व चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भडगाव तालुक्यातील कजगाव, पाथर्डी, भोरटेक, उमरखेड पाचोरा तालुक्यातील दिघी, भडाळी, नेरी, टाकळी बु”, पिंप्री बु” प्र. भ., वडगाव खु” प्र. भ., खाजोळा, घुसर्डी बु” व वडगाव मुलाने या गावात पाणी शिरल्याने घरांचे मोठे नुकसान होवुन अन्नधान्य खराब झाले आहे. नुकसानग्रस्त झालेल्या कजगाव येथे तहसिलदार मुकेश हिवाळे व नगरदेवळा परिसरात तहसिलदार कैलास चावडे यांनी तातडीने अन्नधान्याचा पुरवठा केला. बैठकीत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, नुकसानग्रस्त गावातील एकही शेतकरी पंचनाम्या पासुन वंचित राहता कामा नये. शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे.

कोकणाच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळवुन देणार 

गेल्या तीन दिवसांपूर्वी पाचोरा – भडगाव तालुक्यात फारसा पाऊस झालेला नसला तरी वरील भागात धगफुटी झाल्याने पाचोरा – भडगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहुन गेल्या असुन घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून नियमित तुटपुंजे अनुदान मिळते. यामुळे शेतकऱ्यांच्या बियाणे, खते, औषधी साठी झालेला खर्च ही निघणार नसल्याने मी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन कोकणाच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांचेकडुन मुरुमाच्या रॉयलटीचा प्रश्न सोडविला

पाचोरा – भडगाव तालुक्यातील अनेक रस्ते खचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असुन त्या रस्त्यांवर मुरुम टाकण्यासाठी तातडीने रॉयलटी भरावी लागणार होती. मात्र ठेकेदारा मार्फत तातडीने रस्त्यांवर भर टाकल्या नंतर ठेकेदाराचे बिल अदा करते वेळी रॉयलटी भरण्याची परवानगी आमदार किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे बोलणे केल्यानंतर तात्काळ रॉयलटीचा प्रश्न सोडविण्यात आला. बैठकीत प्रास्ताविक तहसिलदार कैलास चावडे यांनी केले.

 

 

Protected Content