Home Cities चाळीसगाव चाळीसगावात मंगेश चव्हाण यांना किशोर पाटील यांचा जाहीर पाठींबा

चाळीसगावात मंगेश चव्हाण यांना किशोर पाटील यांचा जाहीर पाठींबा


manghesh chavhan

चाळीसगाव, प्रतिनिधी | मी चाळीसगावातून विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक होतो. मात्र राज्य आणि केंद्राच्या समितीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना.गिरिश महाजन यांच्या मार्गदर्शनाने या विधानसभा निवडणुकीसाठी मंगेश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाने घेतलेला निर्णय मी प्रामाणिकपणे मान्य केला असून मंगेश चव्हाण यांना मी पाठिंबा जाहीर करीत आहे, असे प्रतिपादन किशोर पाटील ढोमणेकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केले.

 

मंगेश चव्हाण यांच्या विजयासाठी तालुकाभर प्रचार कार्यात सहभागी होऊन त्यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील व मंगेश चव्हाण हे ही उपस्थित होते. डॉ. पाटील यावेळी म्हणाले की, भाजपा पक्ष हा किशोर पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत व पक्षाला बांधील असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झालेला आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान योग्य ती जबाबदारी देण्यात येईल.

यावेळी मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांचे आभार व्यक्त करताना म्हटले की, पक्षाने मला जरी तिकीट देवून संधी दिलेली असली तरी सर्व इच्छुक उमेदवार जे माझ्या सोबत आहेत तेच खऱ्या अर्थाने या विधानसभेतील नायक असतील. किशोर पाटील हे जनतेच्या सेवेसाठी व तालुक्याच्या विकासासाठी माझ्यासोबत आलेत त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी भाजपाला विजयी करण्याचा जो संकल्प त्यांनी बोलून दाखवला आहे, हीच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची ताकद आहे, असेही ते म्हणाले.


Protected Content

Play sound