Home उद्योग पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते किरण वाणी ‘सर्वोत्कृष्ट उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित!

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते किरण वाणी ‘सर्वोत्कृष्ट उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित!

0
4

पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।शहरातील नामांकित उद्योजक तथा ‘यमुना फूड्स’चे सर्वेसर्वा किरण वाणी यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची व गुंतवणुकीची दखल घेत जळगाव येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातून उद्योग उभा करत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यात त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये जिल्हा नियोजन केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘जिल्हा गुंतवणूक परिषद-२०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील प्रमुख उद्योजकांसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अनेक मंत्रीमहोदय उपस्थित होते. या परिषदेत जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणाऱ्या उद्योजकांचा शासन स्तरावर गौरव करण्यात आला.

पारोळा शहरातून उद्योग क्षेत्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या किरण वाणी यांच्या ‘यमुना फूड्स’ने जिल्ह्यात सर्वाधिक गुंतवणूक केल्याबद्दल त्यांना परिषदेत विशेष मेमोरेंडम प्रदान करण्यात आले. याशिवाय उद्योग क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट उद्योजक’ म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते किरण वाणी यांना हे सन्मानपत्र व मेमोरेंडम प्रदान करण्यात आले.

पारोळ्यासारख्या ग्रामीण भागातून उद्योग उभारणी करून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या किरण वाणी यांच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे. जिल्हास्तरीय परिषदेत पारोळ्याच्या उद्योजकाचा अशा प्रकारे भव्य गौरव झाल्याने पारोळा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सन्मानाबद्दल पारोळा शहर व परिसरातील उद्योजक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound