बालक व बालिकेचे अपहरण करणारा अटकेत

अमळनेर अमोल पाटील । जळगाव शहरातून बालिका व बालकाचे अपहरण करणार्‍या नराधमाला आज अमळनेर येथील एका नागरिकाच्या सतर्कतेने अटक करण्यात आली आहे. यातील मुलगा व मुलगी सुखरूप असून त्यांना पालकांच्या सुपुर्द करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील गोपाळपुरा भागात मूळचे शेलजा (ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) येथील रहिवासी असणारे चव्हाण कुटुंब वास्तव्यास आहेत. यात राजू दत्तू चव्हाण हे पत्नी राणी व मुले काजल, नंदिनी व प्रवीण हे येथे राहत असून तेे शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. २७ मे रोजी दुपारी त्यांच्या घरी त्यांच्या परिचयातील सुनील बारेला हा आला होता. यानंतर तो तो चिकन घेण्याच्या बहाण्याने काजल राजू चव्हाण (वय १०) व मयूर रवींद्र बुनकर (वय ९) या दोन बालकांना घेऊन गेला. बराच वेळ झाला तरी बारेला व दोन्ही बालके घरी न आल्यामुळे राणी चव्हाण यांनी चिकनच्या दुकानदाराकडे चौकशी केली. त्यावेळी हे तिघे दुकानाकडे आलेच नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे राणी चव्हाण यांच्यासह परिसरातील लोकांनी दोन्ही बालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. 

यानंतर चव्हाण कुटुंबाने सुनील बारेला याच्या मुळ गावी तपास घेतला असता तो कधीपासूनच गाव सोडून गेल्याची माहिती मिळाली.  यामुळे राणी चव्हाण यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सुनिल पडत्या बारेला (रा. चिरमलीया, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी अपहरण करणार्‍याचा तपास सुरू केला होता. आज अमळनेर शहरात सुरेश पापाजी दाभोडी यांना अपहरण करणारा सुनील बारेला हा दोन बालकांसह फिरतांना दिसला. ही आपली मुले असून आम्ही कामाच्या शोधात असल्याचे त्याने सांगितले. मात्र दाभोडी यांना संशय आल्याने त्यांनी या सर्वांना विवेक भोई यांच्या तबेल्यावर नेले. तेथून पोलिसांना पाचारण करून  अपहरणकर्त्यासह दोन्ही मुलांना पोलिसांच्या सुपुर्द केले आहे.

दरम्यान, सुरेश दाभोडी व विवेक भोई यांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडला गेल्यामुळे त्यांचे पोलिसांनी कौतुक केले.

Protected Content