विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माजी विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने माजी विद्यार्थ्यांची नोंदणी व्हावी, यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून या सुविधेचे उदघाटन राज्यपालाचे प्रधान सचिव संतोषकुमार आणि माजी विद्यार्थींच्या उपस्थितीत करण्यात आले.

विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर अल्यूमिना कनेक्ट या नावाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठातून शिक्षण घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील घडामोडी तसेच विद्यापीठाची प्रगती याबद्दलची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विद्यापीठाचे ई-स्वरुपात निघणारे ई-उत्तमविद्या हे गृहपत्र याठिकाणी उपलब्ध राहिल. जे माजी विद्यार्थी उद्योग क्षेत्रात आहेत आणि ते रोजगार उपलब्ध करून देवू शकत असतील तर त्यासाठी हे उद्योजक विद्यार्थी आवश्यक शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची नोंदणी या ठिकाणी करू शकतील. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाबाबत त्यांच्या काही सुचना असतील तर हे माजी विद्यार्थी ऑनलाईन सुचना देवू शकतील. विद्यापीठाच्या भौतिक सुविधांसाठी तसेच संशोधनाच्या फेलोशिपसाठी माजी विद्यार्थी देणगी देवू इच्छित असतील तर तशी सुविधा असणार आहे व त्यांना आयकरातही सूट मिळेल. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या पुढाकाराने प्रथमच या प्रकारची माजी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली आहे.

यावेळी बोलतांना प्रधान सचिव संतोषकुमार यांनी विद्यापीठाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे महत्व अधिक असून देणगीच्या स्वरूपात माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला मदत करावी ज्यामुळे सध्या शिकणा-या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असे ते म्हणाले. प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी आपल्या मनोगतात माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यापीठाचे नेटवर्क तयार व्हावे आणि हे विद्यार्थी विद्यापीठाशी कायम जोडले जावेत यासाठी हा प्रयत्न आहे. विद्यापीठाच्या उद्याच्या उत्तम भविष्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचेही प्रा. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी चर्चेत भाग घेवून काही सुचना केल्या व विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाच्या वाटचालीत सक्रिय सहभाग राहील अशी ग्वाही दिली. यावेळी माजी विद्यार्थी डॉ. मोहम्मद शाहीद, डॉ. किरण मराठे, डॉ. निलेश तेली, डॉ. अरूण पाटील, डॉ. के. पी. आधीया, वात्सल्य बेंडाळे, डॉ. योगेश बाफना, वर्षा जैन, डॉ. उज्वला पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील, सागर अमळनेरकर, जितेंद्र बोहरा, अमित भांरबे, भूषण नारखेडे, डॉ. निलेश पाटील, डॉ. उज्वल पाटील, डॉ. मोनाली पाटील, डॉ. किरण मराठे हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. समीर नारखेडे यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी इंगळे, माजी बीसीयूडी संचालक प्रा. डी. जी. हुंडीवाले, प्रा सतिश कोल्हे, प्रा. किशोर विश्वकर्मा, प्रा. प्रवीण पुराणिक, प्रा. उज्ज्वल पाटील, दाऊदी हूसेन हे उपस्थित होते.

Protected Content