मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील अंकुश राजेंद्र चौधरी यांनी यावर्षीही खान्देशचा मान उंचावणारी उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपली ठळक छाप उमटवली आहे. ‘Khandesh Heats’ या बास्केटबॉल संघाचे मालकी हक्क मिळवत त्यांनी ग्रामीण भागातूनही मोठी स्वप्ने साकार करता येतात, हे सिद्ध करून दाखवले आहे.
या संघामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा समावेश असून मुंबईचे रोहित पवार, कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक, नागपूरच्या नमिता थापर आणि मुंबईचे शशांक गोएंका यांसारख्या नामांकित व्यक्तींसोबत अंकुश चौधरी यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. चांगदेवसारख्या छोट्याशा गावातून पुढे येत त्यांनी राज्यस्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या या यशामुळे खान्देशात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंकुश चौधरी हे प्रगतिशील शेतकरी, यशस्वी राजकारणी आणि समाजकारणी म्हणून ओळखले जातात. जनता शिक्षण मंडळ, चांगदेवचे चेअरमन म्हणून तसेच बाजार समितीच्या संचालक पदावर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत दूरदृष्टी, नियोजन आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते, ज्यामुळे त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपली छाप पाडली आहे.
त्यांच्या यशामागे कौटुंबिक संस्कारांचाही मोठा वाटा आहे. त्यांचे वडील स्वर्गीय राजेंद्र त्र्यंबक चौधरी यांना खेळाची विशेष आवड होती. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत अंकुश चौधरी यांनी क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत समाजोपयोगी कार्य उभारण्याचा प्रयत्न केला आहे. व्यस्त दिनचर्येतूनही त्यांनी आपल्या छंदाला जोपासत त्याला व्यापक स्वरूप दिले आहे, हे विशेष उल्लेखनीय ठरते.
१४ ते २२ मार्च दरम्यान या बास्केटबॉल स्पर्धेतील सामने Z5 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असून, या निमित्ताने अंकुश चौधरी आणि त्यांच्या ‘Khandesh Heats’ संघावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी प्रेरणा मिळत आहे.



