Home Cities जळगाव जळगावमध्ये ‘विजय दिवस’ उत्साहात साजरा ; संघर्षाच्या स्मृतींना उजाळा

जळगावमध्ये ‘विजय दिवस’ उत्साहात साजरा ; संघर्षाच्या स्मृतींना उजाळा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । १९७५ च्या आणीबाणीविरोधात लढा देत लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमींच्या कार्याची आठवण जागवण्यासाठी जळगाव शहरात २१ मार्च रोजी ‘विजय दिवस’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जळगाव शहर लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आणीबाणी काळातील मिसा बंदी, सत्याग्रही आणि लोकतंत्र सेनानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

२१ मार्च १९७७ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या दिवशी संघावरील बंदी उठवण्यात आली आणि तब्बल १९ महिने कारावास भोगलेल्या मिसा बंदींची मुक्तता झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ मार्च ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ९ वाजता शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील जी. एम. फाउंडेशन कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून आणीबाणीच्या काळातील कठीण परिस्थितीचा उल्लेख करत त्या काळातील योद्ध्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आजचे स्वातंत्र्य अबाधित असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारत माता, नानासाहेब देशमुख आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सत्याग्रहींनी आणीबाणीच्या काळातील तुरुंगवास, संघर्ष आणि त्यातून उभारी घेतलेल्या लोकशाही लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. १९ महिन्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेला विजय आजही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक उदय भालेराव (बाल सत्याग्रही) होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जळगाव शहरातील विविध मिसा बंदी, सत्याग्रही आणि लोकतंत्र सेनानी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी उदय भालेराव यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.


Protected Content

Play sound