खडसेंनी संघर्षाची नव्हे तर संवादाची भूमिका घ्यावी- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर । गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारे एकनाथराव खडसे यांनी संघर्षाची नव्हे तर संवादाची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळातच खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे नाराज झालेल्या एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना संघर्षाची भूमिका न घेता संवादाची भूमिका घ्या असे आवाहन केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथराव खडसेच्या आरोपाबाबत आणि अस्वस्थेबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली. खडसे यांच्याशी पक्षातील काही मंडळींनी संवाद साधला आहे. त्यामुळे लवकरच सर्व काही नीट होईल. खडसे यांच्यावर अनेक आरोप झाले. दाऊदच्या पत्नीचे आणि नाथाभाऊंचे संभाषण झाल्याचा आरोप होता. त्यामध्ये २४ तासात त्यांना क्लीन चिट मिळाली. ज्या एमआयडीसी भूखंड प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्या प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली. ज्या भूखंड प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याना दोषी नसल्याचा निर्वाळा दिला. सर्व प्रकरणात त्यांना निर्दोष ठरवल्यानंतर उठसूठ फडणवीसांवर आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी आता संघर्षाऐवजी संवादाची भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

Protected Content