जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या राजकीय घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सध्या सुरू असणारा खेळ हा सत्तेसाठी सुरू असल्याची जोरदार टीका केली.
आज सायंदैनिक साईमत या वर्तमानपत्राच्या तपपूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांती जोरदार राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले की, राजकारण हे आधी चांगले होते. मात्र गेल्या सात-आठ दिवसांपासून विचीत्र खेळ सुरू आहे. एकमेकांच्या विरोधात असणारे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष आता एकत्र आले आहेत. तर भाजप आणि अजित पवार एकत्र आल्याचे दिसून येत आहे. हा सर्व खेळ सत्तेसाठी सुरू असून आता लाजलज्जेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आलेल्या आहेत. आपल्यावर मंत्री असतांना आरोप झाल्याने राजीनामा द्यावा लागला. यात आपण निर्दोष सिध्द झालो तरी याची क्लिन चीट मिळाली नाही. तर अनेक भ्रष्टांना पक्षात स्थान मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आज विधीमंडळात नाथाभाऊ असते तर ही वेळ आली नसती असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.