कंटेनरवर झाड कोसळल्याने चालक गंभीर जखमी (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 08 09 at 14.43.06

चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गावर हिरा कॉटनसमोर मालवाहू कंटेनरवर झाड कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासांपासून पुर्णपणे खोळंबली आहे.

 

कंटेनर ड्रायव्हर कॅबीन चक्काचूर
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर मार्गावर हिरा कॉटनसमोर मालवाहू कंटेनरवर क्रमांक (जीजे 16 वाय 5605) झाड कोसळल्याने कंटेनर चालक गुरफान अहमद इसारार रा. सुलतानपूर जि. वासोडी (उत्तरप्रदेश) जखमी झाला. जखमीस उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. झाड इतके मोठे होते की ड्रायव्हर केबीन पूर्णपणे चक्काचूर होऊन गेली होती. केबिनच्या पत्र्यात ड्रायव्हर अडकून पडला होता. त्या झाडाला इलेक्ट्रॉनिक कट्टर आणि जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले.

वाहतूकीचा खोळंबा
यावेळी रस्ता बंद झाल्याने जळगाव-चोपडा वाहतूक जवळपास दोन तास थांबली होती. एक किलोमीटर ते दीड किलोमीटरपर्यंत लांब लाईन लागल्याने वाहतूक सुरळीत करायला दोन ते तीन तास लागले. येथील काही स्वयंसेवकांनी मदत करून जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते.

 

chopda news

गेल्या 24 तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यात कहर निर्माण झाला आहे. शहरातून वाहणारी रत्नावती नदी दुथळी भरून वाहत आहे. रस्तावर पाणी वाहत असल्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश सहित लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नगरपालिकेने नाले सफाईचे काम व्यवस्थित न केल्यामुळे गटारांना नाल्याचे स्वरूप प्राप्त आले आहे. मात्र मुख्याधिका-यांनी पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता असून अतिवृष्टी होण्यासंदर्भातील माहिती नदीकाठावरील रहिवासांनी देण्यात आली असून सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्यासाठी सांगण्यात आले होते.

बसेस डेपोत थांबून
तसेच तालुक्यातील सात वाजेच्या सुमारास गलंगी गावातील सपना हॉटेल जवळ झाड कोसळल्याने गुजरात व मध्यप्रदेश कडे जाणाऱ्या गाड्या जळगाव, यावल, डेपोच्या शिरपूर कडे जाणाऱ्या गाड्यादेखील चोपडा डेपोत थांबविण्यात आल्या आहेत. तसेच नासिक, मुंबई, पावागड, गाड्या चोपडा डेपोत थांबविण्यात आल्या आहेत.

बस फेऱ्या रद्द
खेड्यावरील जाणाऱ्या चहार्डी, वरडी, घुमवाल, मालखेडा, धवली, कृष्णापुर, नरवाडे, विटनेर, अजंटीसिम, कुरवेल, गरताड, विचखेडा, विषणापुर, शहरातील सुंदर गढीत पाणी वाढल्याने चुंचाळे, चौगाव, लासुर, गोरगावले गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वैजापूर अनेर नदीला पुलापर्यंत पाणी आल्याने बलवाडी, वैजापूर ,देव्हारी या गाड्यापण दिवसभर बंद आहेत. लांब पल्ल्याच्या पावागड, सुरत, इंदोर, वापी,बडोदा या गाड्याही अतिवृष्टीमुळे थांबविण्यात आल्या आहेत. या वरील सर्व रद्द फेऱ्यांची माहिती रा.प.महामंडळचे चोपडा आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांनी दिली.

काही गावात घरांची पडझड
तालुक्यातील मितावली, हातेड, मामलदे, धानोरा, अडावद, वडती, मोहरद, लासूर, अकुलखेडा आदी ठिकाणी घराची पडझड होऊन नुकसान झाले आहे. मौजे हिंगोणा येथे काही घरातमध्ये पाणी शिरले आहे. तसेच मामलदे येथे काही भागात पाणी घुसल्याने अनेक घराचे नुकसान झाले आहे. हातेड येथे गुरांची गोठ्याची भिंती कोसळल्याने काही बैल जखमी झाले आहे.

गूळ धरणातून पाणी सोडले
गूळ धरणातून सकाळी ७ वाजेपर्यंत ३१५० क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आले होते. मात्र पाऊस न थाबल्याने दुपारी 11 वाजेच्या सुमारास १५,७५० क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आल्याने गूळ नदीला पूर आला आहे. तसेच अजून पाऊस असाच सुरू राहिला तर अजून जास्तीचे पाणी विसर्ग करण्यात येईल. त्यामुळे गूळ नदी काठावरील लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा तहसिलदार अनिल गावित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २८० एमएम पाऊस झाला होता. परंतु यावर्षी आजपर्यंत ४०५ एमएम पाऊस झाला आहे. मागील वर्षा पेक्षा दीड पटीने पाऊस झाला आहे.

तालुक्यातील पावसाची नोंद
चोपडा तालुक्यातील मंडळ भाग निहाय पाऊस टक्केवारी चोपडा- ८७ एमएम, धानोरा-९१ एमएम, अडावद-८९ एमएम,गोरगावले-५२ एमएम, चहार्डी १०२ एमएम, हातेड- ९० एमएम, लासुर- ९० एमएम एकूण- ५०७ एमएम पाऊस झाला.

नाला खोलीकरणाचा फायदा
चोपडा तालुक्यात ह्या वर्षी चांगली जनजागृती झाल्याने अनेक गावांत व शहरात नालाखोलीकरण करण्यात आले होते यात प्रामुख्याने चोपडा पिपल्स बँक आणि भारतीय जैन संघटना मार्फत केलेले नालाखोलीकरण, घनश्याम भाऊ मित्र मंडळ, आमदार चंद्रकांत सोनवणे, जैन ब्रदर्स, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तसेच लोकवर्गणीच्या प्रयत्नांतुन अनेक गावात तसेच चोपडा शहरात अनेक ठिकाणी नालाखोलीकरण करण्यात आले होते. ह्या नालाखोलीकरण झालेल्या ठिकाणी लाखो लिटर पाणी साचले असून ओव्हरफुल होऊन पाणी बाहेर सोडण्यात आले आहे.

Protected Content