कन्हैया कुमार व जिग्नेश मेवाणी कॉंग्रेसच्या वाटेवर

नवी दिल्ली | सीपीआयचा नेता कन्हैया कुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी हे  कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

जेएनयू आंदोलनामुळे देशभर चर्चेत आलेले कन्हैया कुमार  तसेच गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी  हे दोन्ही नेते कॉंग्रेसमध्ये सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राहुल गांधींच्या  गुप्त बैठका सुरु आहेत.  कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यासोबत गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत कॉंग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कन्हैया कुमारने कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी त्यांना पराभूत केलं होतं. तर जिग्नेश मेवाणी यांनी आक्रमकता दाखवत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले आहे. सध्या भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रीमंडळात सर्व नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आल्याने भाजपमधील एक गट नाराज असतांना मेवाणी यांच्या सारखा आक्रमक नेता पक्षात आल्यास याचा कॉंग्रेसला लाभ होण्याची शक्यता आहे. याचमुळे राहुल आणि कन्हैया कुमार तसेच जिग्नेश मेवाणी यांच्यात गुप्त बैठका होत असल्याची चर्चा आहे.

 

Protected Content