उत्तर प्रदेशात जंगलराज ! : अशोक चव्हाण

मुंबई- राहुल व प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तरप्रदेशात जंगलराज असल्याचे सिद्ध झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेत्यांसोबत आज उत्तर प्रदेशात झालेल्या गैरवर्तुणकीबद्दल अशोक चव्हाण बोलत होते. हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले खा. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ज्या पद्धतीने रोखण्यात आले, धक्काबुक्की झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ते पाहता उत्तर प्रदेशात लोकशाहीचे, कायद्याचे राज्य नसल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात जंगल राज आहे, असे नेहमीच म्हटले जाते आणि आज काँग्रेस नेत्यांना रोखून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, अत्याचार दडपण्याचा प्रयत्न झाला, सर्व कायदे-नियम धाब्यावर बसवण्यात आले, माणुसकीला हरताळ फासला गेला, ते पाहता उत्तर प्रदेशात खरोखरच जंगल राज आहे, हे स्वतः तेथील राज्य सरकारनेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले, असे चव्हाण पुढे म्हणाले.

एका तरूणीवर अत्याचार होतो, निर्घुण हत्या होते, तिला वेळेवर उपचार मिळत नाहीत, पीडित कुटुंबाच्या तक्रारीची वेळेवर दखल घेतली जात नाही, शेवटी त्या मुलीचा दुर्दैवी अंत होतो आणि पोलिस प्रशासन कुटुंबाची अनुमती न घेता मध्यरात्री लपून-छपून परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार करतात, हा सगळा प्रकार अतिशय क्रूर, अमानुष आणि संवेदनशून्य आहे. या घटनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा करावा तेवढा निषेध कमी ठरेल. अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आणि तिथे नेमके काय घडले, याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जात असतील तर त्यात काहीही गैर नव्हते. तरीही त्यांना का अडवले गेले, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले पाहिजे. तसेच या संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

Protected Content