पहूरच्या पत्रकारांचा उद्या महामार्गावर ‘रास्ता रोको’

पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खानदेश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वरील पहूर गावाजवळ वाघूर नदीवरील पुलाचे काम गेल्या साडेचार वर्षांपासून रेंगाळले असून शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . पुलाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे , नवीन पुल वाहतुकीसाठी खुला करावा , पुलाच्या दोन्ही बाजूस असणारे जीव घेणे खड्डे कायमचे कॉंक्रिटीकरण करून भरावेत , पुल परिसरात आवश्यक त्या ठिकाणी कठडे बसविण्यात यावेत , तीन निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यास कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे उद्या शुक्रवार दिनांक १२जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता वाघुर नदी पुलावरच ‘ रस्तारोको ‘ आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनासंदर्भात आज गुरुवारी सकाळी ११ वाजता शहर पत्रकार संघटनेतर्फे पहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व जामनेर येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले . यावेळी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत , ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम आप्पा लाठे , कार्याध्यक्ष किरण जाधव , सदस्य डॉ . संभाजी क्षीरसागर , माजी अध्यक्ष शंकर भामेरे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.

सदर पुलाचे काम रखडलेले असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना – विद्यार्थिनींना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे . पहूर बस स्थानकापासून शेंदुर्णी रस्त्यावर आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , उर्दू मिलत हायस्कूल , महावीर पब्लिक स्कूल , जिल्हा परिषद उर्दू शाळा असून शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी याच पुलावरून ये -जा करतात . एकीकडे पादचारी पुल बंद आहे , तर दुसरीकडे नवीन पुलाचे काम रखडलेले आहे .यातच भर म्हणून की काय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना जीव घेणे खड्डे आणि पावसाळा असल्याने पुलावर साचलेली तळी , यामुळे पायी चालणाऱ्यांना जणू काही मृत्यूच सोबत घेऊन जात आहोत की काय ? असेच वाटते. संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शालेय विद्यार्थी आणि निरपराध नागरिकांच्या जीवाशी आणि भावनांशीच क्रूर खेळ खेळत असून तीन जीव गमावलेल्यांमध्ये १ प्रतिभावंत बालकवीत्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे ही डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाची पाचवीची विद्यार्थिनी होती .

एकीकडे सरकार शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असताना दुसरीकडे मात्र शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे . याकडे शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे की काय असा प्रश्न समोर येत आहे . पहूर पुलाचा प्रश्न मार्गी लागावा ही सामाजिक भावना तीव्र होऊन जनप्रक्षोभ उसळण्यापूर्वीच शासन आणि प्रशासनाने या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधून समस्या सोडवणे गरजेचे आहे . या ज्वलंत समस्येसाठी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .

Protected Content