एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कासोदा येथील बेलदार समाज सभागृहात ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना मानद डॉक्टर उपाधी मिळाल्याबद्दल गौरव समारंभ यासह दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मौलाना आझाद विचार मंच, त्रिशक्ती गृप, महाराष्ट्र राज्य व मित्र परिवारातर्फे नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यावेळी “सामान्य कार्यकर्ताही सामाजिक कार्यातून यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो. पैसा हे सर्वस्व नाही. निःस्वार्थी समाजसेवेचा आनंद हीच अक्षय संपत्ती नुरूद्दिन यांनी कमविली आहे.” असे प्रतिपादन जळगावचे माजी उपमहापौर तथा मौलाना आझाद विचार मंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.करीम सालार यांनी व्यक्त केले.
विचारमंचवर प्रमुख अतिथी कासोदा सरपंच महेश पांडे, प्रमोद पाटील चिलाणेकर, पत्रकार प्रतीक जाधव, डॉ.मोहम्मद सादिक शेख आदी उपस्थित होते.
प्रारंभी गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. सालार तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सत्कारित करण्यात आले. इंडियन मुस्लिम फ्रंट पुणे तर्फे महाराष्ट्र कर्मचारी सदस्य जुल्फीकार अली यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना गौरवण्यात आले. गिनीज बुकमध्ये नोंद झालेले जळगाव येथील चित्रकार सुनील दाभाडे यांनी रेखाटलेले समाजसेवक नुरुद्दीन मुल्लाजींचे छायाचित्र देऊन दाभाडे यांनी सन्मानित केले.
डॉ.कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे विशेष सन्मान –
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे मानद डॉक्टरेट उपाधी मिळाल्याबद्दल पत्रकार तथा समाजसेवक नुरुद्दिन मुल्लाजी कासोदेकर यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय सुपडू लुल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पत्रकार प्रतिक जाधव व अब्दुल हाफिज अब्दुल हक यांचा सत्कार करण्यात आला. अ.भा.मराठी साहित्य परिषद शाखा जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांचाही शाल व ग्रंथभेट देऊन विजय लुल्हे यांनी विशेष सन्मान करून पुढील उज्ज्वल कार्याला शुभकामना दिल्या.
कार्यक्रमास उपसरपंच अब्दुल अजीज सर, ग्रामपंचायत सदस्य बंटी चौधरी व भैय्या राक्षे,मुश्रीम पठाण, अश्फाक अली, अबू फिरोज शेख, अरिफ मण्यार, ॲडव्होकेट जयेश पिलोरे, अमजद खान, इस्माईल खान, शहजादी उर्दू हायस्कूलचे चेअरमन जमीर अली यांच्यासह गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व पालकवर्ग, जिल्ह्यातील पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन मुजाहिद खान व आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष आरिफ पेंटर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौलाना आझाद विचार मंचचे आरिफ पेंटर, सलाउद्दीन अल्लाउद्दीन, शेख मन्सूर पठाण, अन्वर मिस्तरी व जबा मिस्तरी यांनी परिश्रम घेतले.