जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून तिघांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रात्री 11 वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको येथे घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विकास खान माज्जिद खान वय-27 रा. एमआयडीसी, फातीमा नगर हा भाड्याने रिक्षा चालवून कुटुंबांचा उदरनिर्वाहा करतो. 16 सप्टेंबर रोजी दिवसभर रिक्षा चालवून झाल्यानंतर घरी जात असतांना शाहू काँप्लेक्स जवळ रात्री 10 वाजेच्या सुमारास दोन महिला रिक्षाची वाट पाहत असल्याचे पाहून विकासने रिक्षा वळविली. यातील एक महिला सुजाता ठाकूर हीला ओळखीची होती. दोन्ही महिलांनी हुडको जाण्यासाठी रिक्षात बसल्या. दोघांना पिंप्राळा हुडको येथे सोडले असता मागून सुजाता ठाकूरचा भाऊ पंकज सुकदेव सोनवणे यांने रिक्षाचालक विकास याला धमकावत “नेहमी तुच का माझ्या बहिणीला सोडायला येतोस” सांगून रागाने व संशयाने पंकज सोनवणे आणि त्यांच्या सोबत असलेले मित्र मनोज रमेश भालेराव, हितेश नाना बाविस्कर यांनी रिक्षा थांबवून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिघे रिक्षात बसून सावखेडा जवळील निर्मनुष्य ठिकाणी तिघांनी बेदम मारहाण करून रिक्षाचालकाच्या खिश्यातील 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, दोन हजार रूपये रोख आणि 250 रूपये किंमतीची चांदीची अंगठी काढून फरार झाले होते.
याप्रकरणी विकास खान यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात भाग 5, गुरनं 160/2019 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.