संजय राऊत बोलले आणि वादळच आलं ! – आव्हाड

मुंबई प्रतिनिधी । डॉक्टर्सबाबतच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होत असतांना आता त्यांच्या मदतीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आले आहेत. त्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.

खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. राऊतांनी माफी मागावी अशी आग्रही भूमिका डॉक्टरांच्या संघटनेने घेतली आहे. या पार्श्‍वभूमिवर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील उडी घेतली आहे. याबाबत आव्हाडांनी ट्विट करत राऊतांवर टीका करणार्‍यांना टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्‍वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्‍नचिन्ह निर्माण केले संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. ह्या विषयावर कोणीही बोलताना दिसलेले नाही. संजय राऊत बोलले आणि वादळच आले असं सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Protected Content