नवी दिल्ली वृत्तसंस्था- राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही माहिती देण्यात आली आहे.
एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.
“नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची होणारी मागणी अधिकारात नसल्याचं आमच्या निदर्शनात आलं आहे. आमच्या मते करोना संकटात आयुष्य थांबता कामा नये. उमेदवारांचं भवितव्य अंधारात टाकू शकत नाही, शिवाय त्यांचं शैक्षणिक वर्षही वाया जाता कामा नये. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन परीक्षा पार पडणार असून ती पुढे ढकलली जाणार नाही. पुनर्विचार याचिका योग्य नाही”., असे न्यायालयाने म्हटले होते .