जेईई , नीट परीक्षा टाळून पर्याय शोधण्याचा मोदींना सल्ला

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा न्यायालयात असतानाच राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय प्रवेश पात्रता ( नीट ) परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या परीक्षा घेण्याला राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह आम आदमी पक्षानं केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

१ ते ६ सप्टेंबर दरम्यान जेईई व एनईईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून सरकारला परीक्षा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.

“केंद्र सरकार JEE-NEET परीक्षेच्या नावावर लाखो विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहे. माझी सरकारकडे मागणी आहे की, देशभरात या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात याव्या आणि या वर्षासाठी प्रवेशासाठी पर्यायी व्यवस्था करावी प्रवेशासाठी NEET-JEE हाच एकमेव पर्याय असल्याचा विचार करणे, हा संकुचित आणि अव्यवहारिक विचार आहे. जगभरात शिक्षण संस्था प्रवेशासाठी नवीन पर्याय स्वीकारत आहेत. मग आपण भारतात हे का करू शकत नाही? ,” असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही सरकारला आवाहन केलं आहे. “आज देशातील लाखो विद्यार्थी सरकारला काहीतरी सांगत आहेत. NEET-JEE परीक्षेबद्दल त्यांची मत ऐकून घेतली पाहिजे आणि सरकारनं यावर समाधानकारक तोडगा काढायला हवा,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांना विनंती केली आहे. “आगामी एनईईटी व जेईई परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना असलेल्या तणावाची आपल्यालाही जाणीव आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की या विद्यार्थ्यांची चिंता समजून घ्यावी,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Protected Content